Mumbai News – मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही विलंबाने धावतील. वसई रोड यार्ड आणि दिवा मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेतल्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही.

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल 20 मिनिटे उशीराने धावतील.

हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी आणि बेलापूर ते खारकोपर दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.