
मुंबई स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी ‘वॉर रूम’ सुरू करा आणि सहाय्यक आयुक्तांनी नियमितपणे रस्त्यावर उतरून वॉर्डा-वॉर्डात प्रत्यक्ष भेटी द्याव्यात असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईच्या स्वच्छतेबाबत पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतला. कोस्टल रोडवर वाहनांच्या वर्दळीमुळे या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र वाहने हवीत. या मार्गांवर स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबी अंतर्भूत असणारी विशेष वाहने (कस्टमाईज्ड व्हेईकल) तयार करण्यासाठी उत्तम संस्थांची मदत घ्यावी. काही वर्दळीची ठिकाणे स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम बनवावीत आणि मग तिथे तशीच स्वच्छता कायम राहील, यासाठी नागरिकांना जागरूक करावे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी उपआयुक्त प्रशांत गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त किरण दिघावकर आणि संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.
दररोज 7200 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
पालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या 7200 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे या वेळी उपआयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. संपूर्ण मुंबईत उत्तमप्रकारे स्वच्छता राखण्यासाठी सेवा आधारित कंत्राट पद्धती अवलंबण्यात आली आहे. कचरा संकलनासाठी अद्ययावत वाहने आणली आहेत. मुंबईत 46 ठिकाणी सुका कचरा विलगीकरण केंद्र असून 94 वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कचरा संकलनासाठी ई-व्हेईकल!
घनकचरा विभाग अंतर्गत कचरा संकलनासाठी आणलेल्या अद्ययावत वाहनांपैकी दहा टक्के वाहने इलेक्ट्रिक आहेत. घनकचरा संकलनासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने वापरणारी मुंबई महानगरपालिका देशातील पहिलीच पालिका असल्याचे या वेळी आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. स्वच्छता राखण्यात नागरिकांचा सहभाग निश्चित करण्यासाठी पालिका आयोजित ‘मुंबई क्लीन लीग’ या स्पर्धेत नागरिक तसेच आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.


























































