
शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणे, थेट शासनालाच भिकारी म्हणणे आणि विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात रमी खेळणे असे प्रताप केल्यानंतरही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी नव्हे तर फक्त थुकपट्टी लावली जाणार आहे. कोकाटेंचे मंत्रीपद न काढता फक्त खातेबदल केला जाणार आहे. त्यांचे कृषी खाते मकरंद पाटील यांना देऊन पाटलांना कृषिमंत्री पदाचा फेटा बांधण्याचा डाव अजित पवार गटाने मांडला आहे. माणिकरावांकडे मग आपोआपच पाटलांकडचे मदत व पुनर्वसन खाते येणार आहे. आता फक्त आपलेच पत्ते इकडून तिकडे करायचा ‘दादां’चा खेळ बाकी आहे. एकंदरीत ‘रमी’त रमलेले ‘माणिक’ मंत्रिमंडळातच राहणार आहे.
अजित पवारांनी भेट नाकारली
आज दुपारी 3 वाजता कोकाटे आणि अजित पवार यांची भेट ठरली होती, परंतु ती अचानक रद्द झाली. अजितदादांनीच कोकाटे यांना भेटणे टाळल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कोकाटेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जबाबदार नेतृत्वाने जे राज्याच्या मंत्रिमंडळात असतील किंवा लोकसभेत, राज्यसभेत असतील त्यांनी बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे असे सांगत, अजितदादाच कोकाटेंबाबत भूमिका मांडतील, असे तटकरे म्हणाले.
ना खेद ना खंत
आरोपांच्या कचाटय़ात सापडल्यानंतर माणिकराव कोकाटे राजीनामा देतील अशी चर्चा होती, परंतु त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली नाही. उलट रमी खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल करणाऱयांना कोर्टात खेचण्याची धमकी त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अजित पवारही नाराज असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कोकाटे यांची कृती असमर्थनीय असल्याची प्रतिक्रिया मंगळवारी दिली होती.