भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. मुंबईतील लोअर परळ येथील नवीन ब्रिजवळ रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
लोअर परळ ब्रिजजवळ सेनापती बापट मार्गाकडे जाणारी इलेक्ट्रीक कार दुचाकीला धडकली. सदर दुचाकी मातुल्य नाका सिग्नल जंक्शनवर उजवीकडे वळण घेत असतानाच कारने तिला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले.
आयुष कैलाश सिंग (20), शिवम कमलेश सिंग (22) आणि विशाल प्रेमबहादूर सिंग (21) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही वरळी परिसरातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांनाही नायर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी आयुषला मृत घोषित केले. तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. मनीष चंद्रभानू सिंग (२५) असे कार चालकाचे नाव असून, कुर्ला येथील रहिवासी आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.