विलेपार्लेतील आरोग्य केंद्र ताबडतोब सुरू करा! वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मागणी

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता मुंबई महापालिकेने विलेपार्ले येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला दवाखाना आणि आरोग्य केंद्राचे उद्घाटन करून पार्लेकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी मुंबई महापालिकेच्या के-पूर्वच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. याआधीही शिवसेनेने पालिकेकडे हा दवाखाना आणि आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती.

विलेपार्ले पूर्व येथील शहाजी रोडवर स्वर्गीय मनोहर पर्रिकर आयुर्वेदिक दवाखाना व आरोग्य केंद्राची कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली पाच मजली इमारत उद्घाटनाशिवाय गेली दोन वर्षे धूळ खात पडली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर हा दवाखाना आणि केंद्र सुरू करून परिसरातील गरीब आणि गरजू रहिवाशांच्या वैद्यकीय सुविधेबरोबरच कोरोना रुग्णांसाठी विशेष कक्ष किंवा राखीव बेड ठेवावेत आणि रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी डिचोलकर यांनी केली आहे. दरम्यान, आरोग्य केंद्र आणि दवाखान्यातील इमारतीत उपकरणे तसेच इतर साहित्य उपब्लध करून देण्यात आले आहे, मात्र इमारतीतील कक्षांसाठी आवश्यक असलेल्या लाकडी फर्निचरसाठी अजूनही टेंडर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे इमारतीचे उद्घाटन रखडले आहे.