
बेस्ट उपक्रम कित्येक वर्षांपासून मुंबईकरांना अखंडित वीजपुरवठा करीत आहे. असे असताना मुंबईकरांवर अदानी कंपनीच्या स्मार्ट विद्युत मीटरची जबरदस्ती कशाला, अशी आक्रमक आणि ठोस भूमिका घेत शिवसेना सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत अदानीचे प्रीपेड विद्युत मीटरला कडाडून विरोध केला.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच बेस्ट समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना सदस्य नगरसेविका प्रवीणा मोरजकर, नितीन नांदगावकर, सुनील आहीर, सुनील मोरे, सचिन पाटील यांनी मुंबईकरांचे हित तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात ठोस मुद्दे मांडले. बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात अदानी कंपनीमार्फत लावण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत नांदगावकर यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. नागरिकांची मीटर बदलाची मागणी नसतानाही त्यांच्या घरी अदानीच्या स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे. जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यामागे गोलमाल काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या भूमिकेला इतर सदस्यांनी सहमती दर्शवली आणि स्मार्ट मीटरला कडाडून विरोध केला.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचे चुकीचे नियोजन
पूर्वी बेस्टचे अकाऊंट आणि ऑडिट विभागाचे अधिकारी रोज येणाऱ्या रोखीच्या पैशांचे योग्य नियोजन करून योग्य गुंतवणूक करीत होते. त्या पैशांचे व्याज बेस्टच्या तिजोरीत जमा होत असे. सध्या पगाराचे चुकीचे नियोजन बेस्टचे नुकसान करीत आहे, याकडे प्रवीणा मोरजकर यांनी लक्ष वेधले. बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याला बेस्ट कामगार सेनेतर्फे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी विरोध केला.

























































