
मुंबईतील मालाडमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. खराब हस्ताक्षर काढले म्हणून खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने तिसरीच्या विद्यार्थ्याला हाताला चटके दिले. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरार गाव पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्री राठोड असे आरोपी शिक्षिकेचे नाव आहे.
मालाड पूर्वेकडील फिल्मसिटी रोडवरील गोकुळधाम परिसरात इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा खासगी शिकवणीत जात होता. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे मुलाला त्याच्या बहिणीने खासगी शिकवणीत सोडले. शिकवणीहून घरी परतताना मुलगा जोरजोरात रडत होता. त्याच्या उजव्या हाताच्या तळहातावर भाजले होते. मात्र शिक्षिकेने मुलगा नाटकबाजी करत असल्याचे म्हटले.
वडिलांनी मुलाकडे विचारणा केली असता त्याने खराब हस्ताक्षर काढल्याने शिक्षिकेने त्याचा हात जळत्या मेणबत्तीवर धरल्याचे सांगितले. वडिलांनी याबाबत शिक्षिकेला जाब विचारला असता तिने कबुली दिली. यानंतर वडिलांनी कुरार गाव पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिक्षिकेविरोधात पोक्सो कायदा आणि बालकांवरील क्रूरतेसंबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.