
मुंबईतील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईत पर्जन्य जलवाहिन्या आहेत. या पर्जन्य जलवाहिन्यांमधील पाणी पुढे चौपाटय़ांवरच्या आऊटफॉलमधून समुद्राला मिळते, पण समुद्राच्या रौद्र रूपाचा दादर चौपाटीवरील महापालिकेच्या आऊटफॉलला फटका बसला. समुद्राच्या उसळलेल्या लाटांसोबत समुद्रातील वाळू ही कीर्ती कॉलेजच्या समोरील चौपाटीवरील महाकाय आऊटफॉलमध्ये जाऊन अडकली होती. त्यामुळे या भागात पाणी तुंबण्याचा मोठा धोका होता, पण चौपाटीवरील सफाई कामगारांनी आऊटफॉलच्या मुखाशी अडकलेली वाळू बाजूला केली तेव्हा गटारात अडकलेले लाखो लिटर पाणी प्रचंड वेगाने बाहेर पडून समुद्राला मिळाले.
गेल्या आठवडय़ापासून या आऊटफॉलमध्ये समुद्राची वाळू अडकल्याने सुमारे आठ-नऊ फूट उंचीच्या या महाकाय आऊटफॉलमध्ये अक्षरशः हजारो लाखो लिटर पाणी तुंबले होते. पुण्यात गुरुवारी झालेल्या पावसाप्रमाणे मुंबईतही पाऊस पडला असता तर या भागातील तुंबलेल्या जलवाहिन्यांमुळे दादर, शिवाजी पार्क, प्रभादेवी परिसरही जलमय झाला असता.
दादर-प्रभादेवी, शिवाजी पार्क चौपाटी नियमितपणे साफ करण्यासाठी पालिकेने एक खासगी एजन्सी नेमली आहे. या एजन्सीच्या कर्मचाऱयांमार्फत दररोज सकाळी आणि संध्याकाळी चौपाटीची यांत्रिक झाडू आणि कामगारांमार्फत सफाई होते. चौपाटीवरील सफाई कामगार कार्तिक आणि व्यंकटेश यांच्या टीमने आऊटफॉलच्या मुखाशी असलेली वाळू बाहेर काढली तेव्हा आऊटफॉलमधील पाण्याचा लोंढा प्रचंड वेगाने बाहेर पडला. काही मिनिटांतच आठ-नऊ फुटांच्या व्यासाचे आऊटफॉलचे मुख पूर्णपणे मोकळे झाला.
समुद्राच्या लाटांच्या तडख्यामुळे दादर चौपाटीवरील बीएमसीच्या आऊटफाँलमध्ये समुद्राची रेती पूर्णपणे घुसली होती. त्यामुळे आऊटफाँल पूर्णपणे चोकअप झाला होता. चौपाटीवरच्या सफाई कामगारांनी आऊटफाँलवरील माती काढताच गटारात तुंबलेले लाखो लीटर पाणी प्रचंड वेगाने बाहेर पडले. pic.twitter.com/TnK9nsUi08
— Saamana Online (@SaamanaOnline) April 3, 2026



























































