
वन विभागाने घरे रिकामी करण्यासाठी नोटीस बजावल्याचा आरोप करीत आज बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधील आदिवासींनी उद्यानाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. मात्र उद्यान प्रशासनाने आपण कुणालाही नोटीस बजावली नसून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सूचना लावल्याचे स्पष्ट केले आहे.
नॅशनल पार्कच्या सीमेमधील सर्व्हे क्र. 291 आणि 297 ही जमीन महसूल नोंदीनुसार ‘आरक्षित वन’ असून वन विभागाच्या नियंत्रणात आहे. मात्र ही जमीन खासगी प्रतिवादींना हस्तांतरित करण्याचा आदेश महसूलमंत्र्यांनी 31 डिसेंबरला दिला होता. यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन विभागाच्या या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. याप्रकरणी उद्या 22 जानेवारी रोजी कोकण विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे.

























































