नौदलाची इन्सास रायफल चोरणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

न्यू नेव्ही नगर येथील एपी टॉवर येथे तैनात अग्निवीराची दिशाभूल करत त्यांच्याकडील इन्सास रायफल, प्रत्येकी 20 जिवंत काडतुसे असलेल्या मॅग्झिन असे शस्त्र चोरणाऱ्या दोघा भावांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. ते दोघे चोरी करून तेलंगणाला पळून गेले होते. मुंबई गुन्हे शाखेने त्यांना तेथे जाऊन पकडले होते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास कफ परेडच्या न्यू नेव्ही नगयेथील एपी टॉवर येथे तैनात असलेल्या अग्निवीर जवानाकडे एक अज्ञात व्यक्ती गेली. क्यूआरटीमधून आल्याचे सांगत त्या व्यक्तीने जवानाकडील इन्सास रायफल, प्रत्येकी 20 काडतुसांचे दोन मॅग्झिन व एक रिकामी मॅग्झिन स्वतः कडे लबाडीने घेऊन जवानाला हॉस्टेलला जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे अज्ञात व्यक्तीला क्यूआरटी जवान असल्याचे गृहित धरून त्याच्याकडे शस्त्र सोपवून जवान निघून गेला होता. त्यानंतर ते शस्त्र घेऊन दोघे भाऊ पळून गेले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राकेश (22) आणि उमेश रमेश डुब्बुला (25) या दोघा भावांना गुन्हे शाखेने पकडले होते. दोघांनाही 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.