
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. बोरिवली स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल ट्रेन तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची रेल्वे स्थानकांमध्ये रखडपट्टी होत आहे. उशिरा आलेल्या गाड्यांना प्रवाशांची खचाखच गर्दी होत आहे.
मुंबई महानगरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या तीव्रतेने प्रवासी हैराण झाले असताना पश्चिम रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मेट्रो आणि हार्बर रेल्वेच्या सेवेमुळे नेहमीच वर्दळीचे स्थानक असलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकात दुपारी गर्दीचे चित्र दिसत आहे. मागील महिनाभरात पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्या फेऱ्यांनी पश्चिम रेल्वेच्या साध्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक आधीच कोलमडले आहे. साध्या लोकल फेऱ्या रद्द केल्या जात असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.



























































