14 मार्चला अर्थसंकल्प, मुंबई विद्यापीठाच्या चहापानावर युवासेनेचा बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 14 मार्च रोजी मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय सभा आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार 12 मार्च रोजी होणाऱ्या चहापानावर युवासेना सिनेट सदस्य आणि ‘बुक्टू’ने बहिष्कार टाकला. विद्यापीठाच्या आडमुठ्या धोरणाचा आणि सिनेट सदस्यांचे कोणतेही प्रश्न सभेत ग्राह्य धरले नाही, याचा निषेध करत हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

अर्थसंकल्पीय सभेसाठी दिलेले प्रश्न मुंबई विद्यापीठाने विचारत घेतले नसल्याबद्दल युवासेना सिनेट सदस्यांनी संताप व्यक्त केला. 2022 ते 2026 या कालावधीत विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती मागण्यात आली होती. तसेच कलिना कॅम्पसमधील मोकळ्या जागेबाबत विद्यापीठ आणि एमएमआरडीए यांच्यामध्ये करार झालेला आहे. या करारानुसार एमएमआरडीएने अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या बदल्यात विद्यापीठ विकासासाठी देण्यात येणाऱ्या सुमारे 1200 कोटींसाठी राज्य सरकारकडे काही पाठपुरावा करण्यात आला आहे का, या प्रश्नांची उत्तरे युवासेना सिनेट सदस्यांनी मागितले होती. मात्र हे प्रश्न विचारत घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चहापानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.