
थर्टी फर्स्टचे काऊंटडाऊन सुरू होताच आवडते डेस्टेनशन गाठण्यासाठी ठाणे, मुंबईतील हवशे-नवशे-गवशे आपल्या कुटुंबकबिल्यासह मिळेल त्या वाहनाने निघाले खरे… पण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून जाताना त्यांना वाहतूककोंडीने गाठले. खंडाळा, लोणावळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रॅफिकचा ‘ना’-ताळ होता ना मेळ. वाहतूककोंडीत अडकल्याने दोन-अडीच तासांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ लागला. त्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या नशिबी आला तो फक्त मनःस्ताप.
नाताळची सुट्टी साजरी करण्यासाठी मुलाबाळांसह अनेक जण एक्सप्रेस वेवरून जात आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे बाजूकडील लेनवर गुरुवारी व आज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. तसेच प्रवाशांचे अतोनात हाल झाले. खंडाळा, लोणावळासह आपल्या आवडत्या डेस्टिनेशनवर वेळेवर पोहोचता आले नाही त्यामुळे पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला. नाताळ सणात वाहतूककोंडीचे विघ्न आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पर्यटकांचा हिरमोड
एक्सप्रेस वेच्या पुण्याहून जाताना बोरघाटाच्या चढणीवर अनेक वाहने गरम होऊन त्यात बिघाड झाला. इंजिन थंड होईपर्यंत तासन्तास एकाच जागेकर गाड्या थांबल्या होत्या, तर काही गाडय़ांच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकला पाचारण करावे लागले. घाटात बहुतेक ठिकाणी हे दृश्य दिसत होते. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूककोंडीचा मोठा फटका दोन दिवसांपासून ऐन नाताळच्या सुट्टीत पर्यटकांना बसल्याने त्यांचा हिरमोड झाला.
पर्यटन स्थळांवर उत्साहाला उधाण
मुंबईच्या चौपाटय़ांसह रायगड, मुरुड, रत्नागिरी, गणपतीपुळे, सिंधुदुर्गच्या चौपाट्या आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर विविध खेळ खेळून आनंद साजरा करीत आहेत. शहरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक निघाल्यामुळे हॉटेलमध्ये बुकिंग फुल झाली आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकर नाताळ सणानिमित्त वाहनांची गर्दी काढल्याने खालापूर टोलनाका येथे टोल भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या, तर खंडाळा घाट चढताना तीन ते चार किलोमीटरच्या रांगा दिसून येत होत्या.






























































