
>>मंगेश मोरे
सकाळ-संध्याकाळी ‘पीक अवर्स’ला प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मुंबई लोकलच्या जीवघेण्या गर्दीबाबत उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. लोकल ट्रेन्सना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ‘अभूतपूर्व गर्दी’ असते. अशा गर्दीत धक्का लागून प्रवासी खाली पडण्याची व त्यात त्याचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारूच शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी नोंदवले आणि लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला आठ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. हा निर्णय रेल्वेला मोठा झटका मानला जात आहे.
हार्बर मार्गावर शिवडी ते कॉटन ग्रीन स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून शिवकुमार विश्वकर्मा या तरुणाचा मृत्यू झाला. 8 ऑक्टोबर 2011 रोजी सकाळी 8 वाजता हा अपघात घडला. लोकलच्या गर्दीने मुलाचा जीव घेतला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी करीत शिवकुमारची आई इसरावतीने न्यायालयीन लढा सुरू केला होता. रेल्वे दावे न्यायाधिकरणाने तिचा भरपाईचा दावा फेटाळला. त्यानंतर तिने 2015 मध्ये उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. तिच्या अपिलावर दहा वर्षांनंतर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी निर्णय दिला.
शिवकुमारला रूळ ओलांडताना लोकलची धडक बसली. तो वैध प्रवासी नव्हता, असे म्हणणे मांडत रेल्वे प्रशासनाने भरपाईच्या दाव्याला विरोध केला होता. तथापि, न्यायालयाने रेल्वेचा विरोध धुडकावत शिवकुमारच्या आईचा दावा ग्राह्य धरला. लोकल ट्रेन्सना सकाळी ‘अभूतपूर्व गर्दी’ असते. अशा गर्दीत धक्का लागून खाली पडण्याची, मृत्यू होण्याची शक्यता नाकारू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अपीलकर्त्या इसरावतीला आठ लाखांची भरपाई मंजूर केली.
मृत तरुणाच्या आईला आठ लाखांची भरपाई
अपीलकर्त्या मातेने बँक खात्याचा तपशील दिल्यानंतर पुढील दोन महिन्यांत रेल्वेने भरपाईची आठ लाखांची रक्कम संबंधित खात्यात वळती करावी. या मुदतीत रक्कम न दिल्यास त्यापुढे 6 टक्के वार्षिक व्याजदराने रक्कम द्यावी, असे सक्त आदेश न्यायालयाने रेल्वेला दिले आहेत.
मृत शिवकुमार वैध प्रवासी नव्हता, असा दावा रेल्वेने आधी न्यायाधिकरण व नंतर उच्च न्यायालयात केला. त्या दाव्याचे खंडन करण्यासाठी इसरावतीने स्वतः साक्ष दिली. तसेच स्टेशन मास्टर्स मेमो, पंचनामा, पोलीस अहवाल, मृत्यू अहवाल तसेच मृत्यूमागील कारणाचे प्रमाणपत्र असे भक्कम पुरावे सादर केले. तब्बल 14 वर्षांच्या लढय़ानंतर मातेला यश आले.
न्यायालयाचे निरीक्षण
पोलीस पंचनामा व रेल्वे स्थानकातील नोंदीनुसार, डाऊन लाईन ट्रॅकवर एक जण बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळले. पोलिसांना पाकीट सापडले. त्यात वडाळा ते सीएसटीएम मार्गावरील रेल्वे पास होता. या कागदोपत्री पुराव्यांवरून मृत तरुण ‘वैध प्रवासी’ होता हेच सिद्ध होते.
रेल्वे ट्रॅकवर पडलेला तरुण तसेच घटनास्थळी त्याच्या खिशातून पडलेल्या पाकिटातील रेल्वे पास विचारात घेण्यास रेल्वे न्यायाधिकरण सपशेल अपयशी ठरले. लोकल ट्रेन्सना सकाळी होणाऱ्या ‘अभूतपूर्व गर्दी’त धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारू शकत नाही.