
पुणे येथे 2012 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. गुह्याचे स्वरूप गंभीर आणि आरोपीची प्रमुख भूमिका लक्षात घेता केवळ कारावासाच्या कारणावरून जामीन देणे योग्य नाही असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. असद खान असे त्या आरोपीचे नाव आहे. पुण्यात 1 ऑगस्ट 2012 रोजी पाच स्फोट झाले. या घटनेत एक जण जखमी झाला. या प्रकरणात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी असद खानला 20 डिसेंबर 2012 रोजी अटक करण्यात आली. तो 13 वर्षांपासून कोठडीत आहे. जामीन अर्जावर न्यायाधीश शायना पाटील यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. विशेष सरकारी वकील वैभव बागडे यांनी जामीन अर्जाला विरोध केला.