सलग दुसऱ्यांदा उपनगरच्याच महिलांचा डंका, मुंबई शहरला नमवत राज्य अजिंक्यपदावर कब्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उपनगरच्या लेकींनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत राज्य कबड्डीवर अधिराज्य गाजवले. सिन्नरच्या सह्याद्री युवा मंचच्या यजमानपदाखाली रंगलेल्या 73व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत महिला गटाच्या अंतिम लढतीत उपनगर संघाने मुंबई शहरला 37-25 असे पराभूत करत सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपदावर आपली मोहोर उमटवली.

राज्यातील दोन मातब्बर संघ आमनेसामने असताना अंतिम लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा होती; मात्र उपनगरच्या चढाईपटूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक सूर लावत शहरच्या बचावफळीला अक्षरशः भेदून काढले. सतत गुणांची बरसात करत त्यांनी सामन्यावर पकड घट्ट ठेवली आणि शेवटी एकतर्फी विजय नोंदवत चषकावर नाव कोरले.

उपनगरचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही तितकाच थरारक होता. उपांत्य लढतीत पुणे संघाने 31-31 अशी बरोबरी साधत उपनगरला रोखले होते. पण सुवर्ण चढाईत निकिता पडवळ हिची जबरदस्त पकड करत उपनगरने 32-31 असा नाटय़मय विजय खेचून आणला. दुसऱया उपांत्य फेरीत रत्नागिरीने मुंबई शहरला कडवी झुंज दिली; मात्र अनुभवी शहर संघाने सुवर्ण चढाईत बाजी मारत अंतिम फेरी गाठली.

अंतिम लढतीत मात्र शहर संघाचा खेळ अपेक्षेप्रमाणे खुलला नाही. उपनगरच्या आक्रमक चढाया आणि भक्कम बचावामुळे शहर पूर्णपणे दबावाखाली गेले. कर्णधार याशिका पुजारी, कोपरा रक्षक प्रणाली नागदेवते, प्रशिक्षक अमित ताम्हाणेकर आणि व्यवस्थापक राजेंद्र अनभवने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरने संघभावना आणि जिद्दीचा उत्तम नमुना सादर केला. गतवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतीलच दोन संघ अंतिम फेरीत भिडले आणि पुन्हा एकदा उपनगरनेच बाजी मारत राज्य कबड्डीत आपलाच दबदबा असल्याचे ठणकावून सांगितले. सलग दुसऱया विजयानंतर उपनगरच्या लेकी आता राज्य कबड्डीच्या सिंहासनावर निर्विवादपणे विराजमान झाल्या आहेत.