मान्सूनची मुंबईतून एक्झिट; उकाडय़ाने केले हैराण

परतीच्या वाटेवर असताना विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावलेल्या मान्सूनने अखेर मुंबईतून काढता पाय घेतला आहे. शहर व उपनगरांतून मान्सून सहा दिवस उशिराने माघारी गेला आहे. हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी मान्सूनच्या एक्झिटची अधिकृत घोषणा केली. एकीकडे मान्सूनने काढता पाय घेताच ‘ऑक्टोबर हीट’चा कहर सुरू झाला असून मुंबईकरांना उकाडय़ाने घामाघूम केले आहे.

यंदाच्या हंगामात मान्सून 8 ऑक्टोबरला मुंबईतून माघारी जाईल, असे हवामान खात्याने सुरुवातीला जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र मान्सून गुरुवारी मुंबईतून माघारी परतला. 24 जूनला मुसळधार हजेरी लावून मान्सूनने मुंबईत एण्ट्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनने दोन आठवडे आधीच एक्झिट घेतली आहे. संपूर्ण हंगामात दमदार हजेरी लावणाऱया मान्सूनचा जोर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून कमी झाला आहे. गेल्या वर्षी उशिरापर्यंत म्हणजेच 28 ऑक्टोबरला मान्सूनने मुंबईत शेवटची हजेरी लावली होती. दरम्यान, मुंबईबरोबरच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतूनही मान्सूनने एक्झिट घेतली आहे.

तापमानात मोठी वाढ

मान्सूनने एक्झिट घेताच मुंबई शहर व उपनगरांत पाऱयाने उसळी घेतली आहे. गुरुवारी हवामान खात्याच्या सांताक्रुझ मॉनिटरिंग स्टेशनवर 34.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. 7 ऑक्टोबरलाही कमाल तापमानाने कहर करीत 35.8 अंश सेल्सिअस अशी चालू वर्षातील विक्रमी पातळी गाठली होती.