
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, विद्यार्थी विभाग आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रामार्फत रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मुंबई विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणावर गड किल्ले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
शिवस्मारक उत्सव समिती किल्ले रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या निमंत्रणाच्या अनुषंगाने या स्वच्छता मोहिमेअंतर्गत किल्ले रायगड आणि परिसरातील प्लॅस्टिक संकलन आणि कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांतील 500 हून अधिक विद्यार्थी, विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्रम अधिकारी हे या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आयोजित केलेल्या किल्ले रायगड स्वच्छता मोहिमेत प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे समन्वयक सुशील शिंदे आणि सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य सहभागी झाले होते. जिल्हा परिषद रायगड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या सहकार्यातून व मुंबई विद्यापीठाचे अधिकारी आणि गटविकास अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि देखरेखीखाली श्रमदान आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गड किल्ले जतन आणि संवर्धन यांवर 2 क्रेडिटचा अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच राबवलेल्या या मोहिमेला विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विद्यापीठामार्फत गड किल्ले स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. नजीकच्या काळात गड किल्ले जतन आणि संवर्धन यांवर 2 व्रेडिटचा अर्थात 45 तासांचा अनुभवाधारीत अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.