संतप्त चाकरमान्यांचे मुंबई-गोवा हायवेवर पाटपूजन, बाप्पा.. खड्ड्यांचे विघ्न दूर होऊ दे, सरकारला सुबुद्धी मिळू दे !

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे पडले आहे. कंत्राटदार आले आणि गेले, सरकारही बदलले. तरीही हा मार्ग काही पूर्ण होईना. वारंवार कोर्टाने ताशेरे ओढूनही मुंबई-गोवा मार्गाचे काम अपूर्ण राहिले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने यंदाच्या गणपतीत चाकरमान्यांचे हाल होणार असून सरकारच्या या बेफिकिरीविरोधात आज संतप्त चाकरमान्यांनी पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे पाटपूजन केले. बाप्पा.. खड्ड्यांचे विघ्न दूर होऊ दे आणि सरकारला सुबुद्धी मिळू दे, असे साकडे चाकरमान्यांनी गणरायाला घातले असून या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

गेल्या 15 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या रखडलेल्या कामाचा उल्लेख करून टिकास्त्र सोडले होते. या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत 4 हजार 531 जणांनी आपला जीव गमावला. 700 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे काम सरकारने अवघ्या 5 वर्षांत पूर्ण केले. पण मुंबई-गोवा महामार्गाचे 471 किलोमीटरचे काम का रखडले, असा संतप्त सवाल करत आज चाकरमानी आणि जनआक्रोश समितीच्या वतीने पळस्पे फाटा येथे गणरायाचे पाटपूजन करून सरकारचे लक्ष वेधले.

महामार्गावरील सर्व अडथळे दूर होऊन जलदगतीने काम पूर्ण होईल, असे आश्वासन काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या दौऱ्यात केले होते. प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा हा दौरा निव्वळ फार्स ठरला. कारण जिथे प्रत्यक्षात खड्डे पडले आहेत त्याठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केलीच नाही. अधिकाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

चाकरमान्यांनी आज गणरायाला साकडे घालून महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि सरकारला सुबुद्धी मिळावी, अशी विनवणी केली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाजवळ गणपतीची स्थापना करणार रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश समितीच्या वतीने ‘पाटपूजन’ आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. 17 ऑगस्टला पेणमध्ये पाटपूजा केली जाणार असून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाजवळदेखील गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येईल, अशी घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली.