Mumbra Accident : कळवा रुग्णालयाबाहेर आक्रोश आणि हुंदके

जखमी आणि मृत रेल्वे प्रवाशांना रुग्णवाहिकेतून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. यावेळी कळवा रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी आक्रोश केला. जखमी प्रवाशांची अवस्था पाहून त्यांच्या नातेवाईकांचे अश्रू थांबत नव्हते. तर मृतांच्या नातेवाईकांचा आकांत थांबत नव्हता. कळवा रुग्णालयाचा परिसर आक्रोश आणि हुंदक्यांनी भरून गेला होता.

अपघातात मृत्युमुखी पडलेले रेल्वे पोलीस विकी मुख्यदल यांची मावशी प्रमिला जाधव या धावतच कळवा रुग्णालयात आल्या. विकी ट्रेनमधून खाली पडल्याचा फोन आला आणि तुम्ही कळवा रुग्णालयात पोहोचा असे आम्हाला सांगितले म्हणून आलो तर विकी आम्हाला सोडून गेल्याचे कळले. त्याची बायको आणि मुलगा आता पोरके झाले, असे सांगताना प्रमिला जाधव यांचे अश्रू थांबत नव्हते. उल्हासनगरचा केतन सरोज याचा मृतदेह पाहून त्याचा मित्र शैलेश जयस्वाल याने हंबरडा फोडला. तर डोंबिवलीत नवे घर पाहण्यासाठी गेलेल्या मयूर शहा याचे निपचित पार्थिव पाहून त्याच्या बहिणींनी आकांत केला. जखमी प्रवाशांना जीवदान मिळावे, त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या दारातच देवाचा धावा केला. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांपुढे हात जोडून आमच्या मुलांना वाचवा हो.. अशी आर्त प्रार्थना ते करत होते.

स्वप्नातले घर घ्यायला बाहेर पडला, पण परतलाच नाही
मयूर शहा (44) हा ठाण्याच्या घोडबंदर परिसरात त्याच्या आईसोबत रहायचा. तो आयटी इंजिनीयर होता. त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत. अविवाहित असलेला मयूर विद्याविहार येथे खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याची डोंबिवलीत फ्लॅट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होती. फ्लॅटमालक डोंबिवलीत राहात होता. त्यामुळे मयूर त्याला भेटायला डोंबिवलीकडे निघाला पण स्वप्नातले घर घ्यायला बाहेर पडलेला मयूर मुंब्र्याच्या धोकादायक वळणावर अपघाताचा बळी ठरला.

घरात कमावणारा एकटा मुलगा गेला
राहुल गुप्ता हा 28 वर्षीय तरुण मुंब्र्याहून मुंबईपर्यंत लोकलने प्रवास करून एका स्टेशनरी दुकानात कामाला जात असे. त्याच्या घरी आई, वडील, दोन लहान बहिणी, एक लहान भाऊ असा परिवार आहे. राहुल हा घरात कमावणारा एकटाच मुलगा होता. आजच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. राहुलच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या, अशी मागणी त्याच्या मित्रांनी केली आहे

कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला
उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मधील हनुमाननगरात राहणारा केतन सरोज (22) याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यामुळे पदवीधर झाल्यानंतर केतन ठाण्यातील आशर आयटी पार्कमध्ये नोकरीला लागला. त्याच्या नोकरीमुळे घराला आधार मिळाला. त्याला आई, वडील आणि दोन लहान भाऊ आहेत. त्यामुळे केतन हा घराचा आधारस्तंभ होता. आज झालेल्या अपघातात दरवाजात उभ्या असलेल्या केतनला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दरवाजातील लोकल प्रवाशाच्या बॅगेचा धक्का बसला आणि तो ट्रॅकवर कोसळला. त्याच डब्यातून त्याचा मित्र दीपक शिरसाट प्रवास करीत होता. केतन कोसळल्याचे कळताच दीपकने चेन खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु फास्ट लोकल थेट ठाण्याला जाऊन थांबली. त्यानंतर दीपकने स्लो लोकल पकडून मुंब्रा गाठले. रेल्वे फलाटावर ठेवण्यात आलेल्या केतनला तातडीने कळवा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु त्याला मृत घोषित करण्यात आले.