
तब्बल 27 कोटी रुपये खर्च करून बांधलेला गोरेगाव येथील वीर सावरकर पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी अडथळा ठरत असल्याने सात वर्षांपूर्वी उभारलेल्या या पुलावर हातोडा पडणार आहे. हा पूल पाडून नवीन उड्डाणपूल होईपर्यंत मालाड, मढ व मार्वेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पालिकेने 2018 मध्ये बांधलेला वीर सावरकर पूल एमटीएनएल नावानेही प्रसिद्ध आहे. कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (वर्सोवा ते दहिसर) हा पूल अडथळा ठरत आहे. त्यामुळे तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले, मात्र हा पूल न पाडता काही अन्य पर्यायाचा विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
न्यायालयाचे दार ठोठावू
या पुलामुळे 45 मिनिटांचा प्रवास दहा मिनिटांत पूर्ण होतो. या पूलासाठी अनेक वर्षे नागरिकांनी पाठपुरावा केला होता. या पुलाचा अडथळा होणार होता तर त्याचे आधीच नियोजन करणे अपेक्षित होते. कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेला हा पूल पाडणे कितपत योग्य आहे याचा प्रशासनाने विचार करावा. यावर तोडगा न निघाल्यास न्यायालयाचे दार ठोठावले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दुमजली पुलाचा प्रस्ताव
वीर सावरकर उड्डाणपूल पाडून त्या जागी दुमजली पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. या दुमजली पुलाचा वरचा भाग मालाडमधील माइंडस्पेसपासून दिंडोशी कोर्टापर्यंत पोहोचेल, तर खालचा भाग सध्याच्या वीर सावरकर उड्डाणपुलाची जागा घेईल. यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणी मिळणार आहे. कोस्टल रोडवरून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर थेट प्रवेश देण्यासाठी हा दुमजली पूल महत्त्वाचा ठरेल, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.