
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या वर्षी 50 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी संघटना फेडरेशन मुंबईच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. तसेच दिवाळीच्या किमान चार दिवस आधी ही रक्कम कामगार, कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अशी मागणीही करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी 29 हजार रुपयांचा बोनस देण्यात आला होता. मात्र यावर्षी त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी संघटना फेडरेशनने केली आहे. याबाबत फेडरेशनने आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी अशोक जाधव, वामन कविस्कर, सत्यवान जावकर, अॅड. प्रकाश देवदास, रमेश भुतेकर, दिवाकर दळवी, प्रकाश जाधव, चंद्रकांत जाधव, प्रशांत तळेकर आदी कामगार नेते उपस्थित होते.