मुरुडच्या मजगाव नदीत ‘जीवघेणे’ पिलर, 15 वर्षांपूर्वी पाडलेल्या पुलाचे खांब काढायला बांधकाम विभागाला वेळ नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
colored by ai

मुरुड तालुक्यातील मजगाव-नांदगाव या दोन गावांना जोडणारा दगडी पूल 15 वर्षांपूर्वी तोडण्यात आला. मात्र या धोकादायक पुलाचे सांगाडे अद्यापही तसेच उभे आहेत. हे ‘जीवघेणे’ पिलर कधीही कोसळतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना याच ढासळलेल्या पिलरवर बसून आजूबाजूच्या गावातील तरुण गळ टाकून मासेमारी करतात. तरीही बांधकाम विभागाला हा सांगाडा हटवायला वेळच मिळत नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?
साळाव-मुरुड रस्त्यावर उसरोली फाटा ते मजगावदरम्यान असलेला हा पूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला. पुलावरील काही ठिकाणचे फक्त स्लॅब काढून पिलर तसेच ठेवण्यात आले आहेत. अर्धवट स्थितीत असलेल्या पिलरवर ग्रामस्थ उभे राहून मासेमारी करतात. तसेच गावातील महिला त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी जातात. यातील एखादा पिलर कोसळून मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा सवाल संतप्त गावकऱ्यांनी केला आहे. या पुलाचे दगडी पिलर लवकरात लवकर हटवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.