
‘अल्लाह एक तूं, नबी एक तूं।…’, ‘अल्ला देवे अल्ला दिलावे।…’, ‘अल्ला करे सो होय, बाबा करतारका सिरताज।…’ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या या अभंगांमधून हिंदू-मुस्लिम सलोखा आणि एकात्मतेचा भाव दिसून येतो. संत अनगडशाह बाबा आणि संत तुकाराम या दोघांमध्ये असलेलं प्रेमाचं नातं पुढची पिढी आजही जतन करत असल्याचे दिसून येते. गणी सय्यद या मुस्लिम युवकाने श्री विठ्ठलचरणी लीन होत एक किलो चांदीचा मुकुट अर्पण केला. जातीयतेचा द्वेष पसरविणाऱया मंडळींना गणीची ही अनोखी भक्ती चपराक देणारी आहे.
लातूर येथील रहिवाशी असलेला गणी सय्यद हा दगड फोडण्याचे काम करतो. त्याने आपल्या कष्टाच्या पैशातून एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला.
सर्व जातीधर्मीयांना एकाच छताखाली आणणारा हा वारकरी संप्रदाय आहे. कोणताही भेदाभेद न करणारा पालखी सोहळा साऱया विश्वाला एकात्मतेचा संदेश देतो. कारण गेल्या शेकडो वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा घेते ती हजरत अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात.
दर्ग्यासमोरील मेघडंबरीत तुकाराम महाराजांची पालखी ठेवली जाते. ही मेघडंबरी अभंग-आरती स्थान म्हणून ओळखली जाते. अनगडशाह बाबांच्या समाधीसमोर तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर तिथे अभंग गायिले जातात. यादरम्यान दर्ग्यात पालखीची पूजाही केली जाते. वारी पंढरपूरकडे पुढे मार्गस्थ होताना वारकरी अनगडशाह बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला निघतात.
अनगडशाह बाबा आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची सुमारे चारशे वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम समाजाची एकता, समता व बंधुभाव यांचं प्रतीक म्हणून ही प्रथा आजही जपली जाते. तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून या भेटीकडे आजही पाहिलं जातं. या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू-मुस्लिम भाविक या ठिकाणी येतात. गणी सय्यदसारखे अनगडशाह बाबांचे अनुयायी आजही श्री विठ्ठलावर हिंदूंइतकीच श्रद्धा आणि आस्था बाळगतात.
Muslim Devotee Offers Silver Crown to Lord Vitthal, Symbol of Communal Harmony
Gani Syed, a Muslim youth from Latur, offers a silver crown worth ₹1 lakh to Lord Vitthal, reflecting deep devotion and promoting Hindu-Muslim unity rooted in Warkari tradition.
Keywords
Muslim offers silver crown to Vitthal, Gani Syed Vitthal devotion, Hindu Muslim unity, Warkari tradition, Sant Tukaram and Anagadshah Baba, Latur Muslim devotee, communal harmony India