
नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत दुबार, स्थलांतरित, मयत व्यक्तींची नावे असल्याचे उघड झाले असून, या यादीवर महाविकास आघाडीने तीव्र आक्षेप घेतला. या गंभीर बाबींचे प्रशासनाकडून निराकरण न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. दरम्यान, मतदार याद्यांबाबत जिल्हा प्रशासनावर सत्ताधारी पक्षाचे दडपण असून, बोगस मतदान घडवून आणण्यासाठी सत्ताधारी राजकीय मंडळींनी सुनियोजित षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले. यावेळी बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, दत्ता जाधव, संजय झिंजे आदी उपस्थित होते.
प्रशासनाने नमुना 14 अंतर्गत नियम 19 (1) (ब) अन्वये मतदारानांच नोटिसा बजावल्या आहेत. 10 सप्टेंबर रोजी आवश्यक त्या कागदपत्रांसह हजर राहिल्याचे सांगितले आहे. त्यादिवशी उपस्थित न राहिल्यास मतदारांना आपले काही म्हणणे नाही, असे समजून उचित कार्यवाही करण्याचे म्हटले आहे. सुमारे 51 हजार नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे एकाचवेळी नागरिकांना न बोलावता विभागणी करावी, कोणत्याही खऱ्या मतदाराचे नाव प्रशासनाने वगळू नये. वास्तविक पाहाता प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना नोटिसा बजावण्याऐवजी नागरिकांना नोटिसा पाठवल्या आहेत. प्रशासनाने मतदारांना वेठीस धरणे थांबवावे, असे काळे, कमळकर, कदम यांनी म्हटले आहे. मतदारांना प्रशासनाने बजावलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने काही तक्रारी, अडचणी असल्यास महाविकास आघाडीच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोटिसा पाहून मतदारांना धक्का
ज्यावेळी मतदारांच्या हातात नोटिसा पडल्या, त्यावेळी त्यांना मानसिक धक्का बसला. मतदाराला माहितीच नव्हते की, त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांचे दुबार नाव नोंदवत बनावट निवडणूक ओळखपत्र तयार केली आहेत. आपल्या देशात मतदान ओळखपत्र हे अनेक शासकीय पुरावा म्हणून वापरण्यास मुभा आहे. बोगस मतदार नोंदणी करत मतदारांच्या नावाचा गैरवापर करत उद्या कोणी त्यांच्या नावे खोटे कर्ज प्रकरण, शासकीय योजनांचा खोटा लाभ घेत घोटाळे केले तर याला जबाबदार कोण? त्यामुळे मतदारांनी त्यांच्या दुबार नावनोंदणीला विरोध दर्शविला आहे. केवळ राजकीय दहशतीमुळे मतदार समोर येऊन बोलू शकत नाहीत. महाविकास आघाडीने हा प्रकार उजेडात आणल्यामुळे मतदारांना वास्तव समजले आहे, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदारांना नोटिसा बजवायला हव्या होत्या
स्वतः संगनमत करत प्रशासनातील ज्या लोकांनी राजकीय नेत्यांच्या दबावातून मतदारांची दुबार नोंदणी केली आहे, त्यांना नोटिसा बजवायला हव्या होत्या. यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून नगर भागाचे प्रांताधिकारी व नगरचे तहसीलदार यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे. आम्ही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य मतदारांना नोटिसा बजावण्याऐवजी प्रांताधिकारी, तहसीलदार यांना त्यांच्या गलथान कारभाराबद्दल नोटिसा बजवायला हव्या होत्या, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.
नागरिकांसाठी हेल्पलाईन
नगर शहर विधानसभा क्षेत्रातील मतदारांसाठी प्रशासनाने बजावलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास महाविकास आघाडीच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाईन नंबर ः किरण काळे (9028725368), अभिषेक कळमकर (9145645629), संभाजी कदम (9422222003).