पुण्यात अजितदादा गट काँग्रेसला नकोसा, समविचारी पक्षांशी जुळवाजुळव; महाविकास आघाडीत घेण्यास विरोध

पुण्यात महाविकास आघाडीमध्ये अजित पवार गटाला बरोबर घेण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यामुळे आता अजित पवार गट वगळून समविचारी पक्षांना बरोबर घेत महाविकास आघाडी होण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. त्यामुळे आता अजित पवार गटाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अजित पवार गटाबरोबर युती तोडत मैत्रीपूर्ण निवडणुकीची घोषणा केली होती. त्यामुळे अजित पवार गट एकटा पडला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येत मनसेलाही सोबत घेत महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. बुधवारी जागावाटपाच्या प्रस्तावावर चर्चादेखील सुरू होत्या. मात्र मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार गटाबरोबर महाविकास आघाडी न करण्याचे आदेश देण्यात आले. समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचे आदेशही प्रदेश काँग्रेसने दिले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीतून आता अजित पवार गटाचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गट काय भूमिका घेणार हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.

पक्षश्रेष्ठांचा निरोप आला आहे, पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी युती करू नका. शिवसेना आणि इतर कोणी येत असेल तर चर्चा करा. मात्र अजित पवारांशी युती करू नका. समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढणार आहोत. – अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसने निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता निवडणूक स्वबळावर लढायची की महाविकास आघाडीतून यावर चर्चा करण्यासाठी पक्षाची बैठक शुक्रवारी (दि. 26) होईल. या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांचेही म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. – अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस