Nagar News : हाँटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू

कोरोणा महामारिच्या नंतर 20 ते 30 वयोगटातील तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत असल्याचे समोर आले आहे. अशातच देवळाली प्रवरा येथील हॉटेल श्रद्धा येथे जेवण करण्यासाठी आलेला 29 वर्षीय तरुण  खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्युचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली प्रवरा येथील विवाहित तरुण नितीन सुरेश वाळुंज हा गुरुवारी (13 जून 2024) रात्री राहुरी फ्रॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवर असणाऱ्या हॉटेल श्रद्धा येथे जेवणासाठी आला होता. हॉटेलच्या पाठीमागे तो खूर्चीवर बसलेला असताना अचानक तो खाली पडला. नितीन खाली पडलेला पाहताच हॉटेल मालक व कामगारांनी धाव घेत त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तो मृत्यूमुखी पडल्याचे निश्पन्न झाले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आज (14 जून 2024) सकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून देवळाली प्रवरात दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर नितीन वाळुंज यांच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. सदर घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बाबासाहेब शेळके, राहुल यादव यांनी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंज, माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी मदतकार्य केले.