
शेततळ्यातील पाणी खेचण्यासाठी टाकलेल्या मोटरपंपाची केबल तोडून पोत्यात पंप भरून चाललेल्या दोन भामट्यांना शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यातील एक भामटा दुचाकीवरून पसार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या दोघा चोरट्यांना राहुरी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आयुब ऊर्फ लुण्या नसीर पठाण, सुनील संजय जाधव (रा. मुसळवाडी, ता. राहुरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अमोल दत्तू पवार (रा. मुसळवाडी) हा घटनास्थळावरून पसार झाला. संकेत सुभाष गल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील लाख गावच्या हद्दीत ही घटना घडली. सुभाष गल्ले हे शेतकरी शेतात गेले असता शेततळ्यातील पाईप व केबल तोडल्याचे त्यांना दिसून आले. गल्ले यांनी शेततळ्यात पाहणी केली असता पाणी खेचणारा इलेक्ट्रीक मोटारपंप गायब असल्याचे दिसले. याचवेळेस उसाच्या शेतातून तिघे बाहेर पडताना दिसल्याने गल्ले यांनी तिघांना हटकत दुचाकीवर बांधलेल्या पोत्यात काय आहे, अशी विचारणा केली. मात्र, तिघांनी विरोध केल्याने गल्ले यांचा संशय बळावल्याने त्यांनी पोते उचकण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी गल्ले यांना मारहाण केली.
यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना पकडले. तर एकजण दुचाकीवरून पसार झाला. या घटनेची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहायक फौजदार विष्णू आहेर, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदीम शेख, संतोष राठोड यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने आयुब पठाण, सुनील जाधव या दोघांना ताब्यात घेतले. अमोल पवार हा घटनास्थळावरून पसार झाला.
अटक केलेल्या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धर्मराज पाटील करीत आहेत.