
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे पंधरा दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आलेला होता. खूनाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिक्षक यांनी भर पावसात घटनास्थळी भेट दिली.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देत घटना स्थळाची भौगोलिक परिस्थिती, रस्ते, पोलिसांनी आजवर केलेला तपास याचा अंदाज घेत काही विशिष्ट सूचना पोलिसांना दिल्या. 16 ऑगस्ट रोजी तालुक्यातील पाचेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस ठाण्यातील पाच विशेष पथके पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत. मात्र अद्यापही पोलिसांना खुनाच्या गुन्ह्याची उकल करता आलेली नाही. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पाच पोलिसांचे एक पथक उज्जैन येथे तीन दिवसापासून तळ ठोकून आहे. अधिक तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.