हिंदुस्थानी लष्कराला मिळाले ‘नागास्त्र’! दोन किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता

हिंदुस्थानी लष्कराच्या ताकदीत पुन्हा भर पडली आहे. ‘नागास्त्र’ हे अत्यंत शक्तिशाली ड्रोन लष्कराच्या ताफ्यात सामील करण्यात आले. दोन किलो स्फोटके वाहून नेण्याची या ड्रोनची क्षमता असून ते दीड तास हवेत राहू शकते. तसेच कोणत्याही वेळी शत्रूच्या ठिकाणांवर अचूक मारा करण्याची क्षमताही या ड्रोनमध्ये आहे. इकॉनॉमिक्स एक्स्प्लोझिव लिमिटेड आणि झेड मोशन ऑटोनॉमस सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी संयुक्तरीत्या ‘नागास्त्र’ या ड्रोनची निर्मिती केली आहे.

हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यात सध्या 120 ‘नागास्त्र’ सामील करण्यात आले आहेत. शत्रूचे बंकर, चौक्या तसेच शस्त्रागार नेस्तनाबूत करण्याची ताकद या ड्रोनमध्ये आहे. साडेचार मीटर उंचीवर हे ड्रोन उडू शकते तसेच दीड तास हवेत विहार करण्याची क्षमताही त्यात आहे. ड्रोनची व्हिडीओ रेंज 15 किमी असून जीपीएस टार्गेट रेंज 45 किमीपर्यंत आहे. या ड्रोनमध्ये दुहेरी सेन्सर बसवण्यात आले असून ते रात्री तसेच दिवसाही काम करतात. देशी बनावटीचे हे नागास्त्र इस्रायल आणि पोलंडहून आयात करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांपेक्षा वैâक पटीने स्वस्त आहे. नागास्त्र ड्रोनचे चीन सीमेजवळ लडाखमध्ये यशस्वी परीक्षण करण्यात आले. लष्कराला एकूण 450 नागास्त्र देण्यात येणार आहेत.