नागोठण्याजवळ एसटीची ट्रकला टक्कर; 11 जखमी, चालकाचा पाय तुटला

ओव्हरटेकच्या नादात भरधाव एसटीने समोरून येणाऱ्या ट्रकला टक्कर दिल्याने नागोठण्याच्या शेतपळस येथे भीषण अपघात झाला. यात ट्रकचालकाचा पायच तुटून पडला आहे, तर एसटीतील 11 प्रवासी जखमी झाले असून सर्वांना तत्काळ नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. शिवथरघळ-ठाणे (MH 20 GC 4568) ही एसटी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून पनवेल बाजूकडे जात होती. सदरील बस 9 वाजण्याच्या दरम्यान शेतपळस गावाजवळ आली असता बसचालक दिनकर डोंगरे यांनी ओव्हरटेकचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी नागोठण्याच्या दिशेला जाणाऱ्या ट्रकवर (DD01G 9351) आदळली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचालक दिनेशकुमार यादव (48) याचा पाय तुटून तो गंभीर जखमी झाला. तसेच बसमधील 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून सोडण्यात आले, तर चालकास पुढील उपचारासाठी अलिबाग येथे रवाना करण्यात आले. पुढील तपास नागोठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रशांत घरत करत आहेत.