
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा आणि पोलिसांवर गृह खात्याचा वचकच राहिलेला नाही. हे कमी म्हणू की काय गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात कळमना पोलीस ठाण्यात सिगारेटचा धूर सोडत तीन पत्ती जुगाराचा डाव रंगल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भर पोलीस ठाण्यात पोलीसच सिगारेटचे झुरके ओढत पत्ते खेळताना यामध्ये दिसत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यात चक्क जुगाराचा डाव रंगल्याचे समोर आले आहे. यावेळी काही पोलीस धूम्रपान करताना दिसत आहेत. #nagpur pic.twitter.com/nCwhU1dwfv
— Saamana (@SaamanaOnline) August 19, 2024
नागपूरमधील कळमना पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये खाकी वर्दी घालून पोलीसच धूम्रपान करताना दिसत आहेत. पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडपणे पत्ते पिसत जुगार खेळत असताना दिसत आहेत. नागपुरात राजरोसपणे गंभीर गुन्हे घडत असताना ज्या पोलिसांकडून येथील वातावरण सुरक्षित ठेवले जाईल अशी अपेक्षा आहे ते पोलीसच पोलीस चौकीत बसून जुगार खेळायला लागले तर कायदा-सुव्यवस्थेचे काय, असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत. यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
जुगार खेळणारे ते दोन पोलीस निलंबित
पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी मनोज घाडगे आणि शाहू साखरे यांना निलंबित करण्यात आले आहे. व्हिडीओत दिसणारे दोन्ही पोलीस कर्मचारी सध्या बीट मार्शल म्हणून कार्यरत नाहीत. हा व्हिडीओ बहुदा जुना असावा. मनोज घाडगे हा पूर्वी कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पण, घटना गंभीर असल्याने दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.