अमेरिकेच्या दबावाखाली काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्या, नागपूरमध्ये वंचित-काँग्रेसचा संघ कार्यालयावर धडक मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या पंतप्रधानांचे नाव एपस्टीन फाइल्समध्ये येणे हे अत्यंत गंभीर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असून देशाला गुलाम बनवणाऱया मोदींचा राजीनामा घ्या, अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडी आणि कॉँग्रेसने नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान केली.

एपस्टीन फाइल्स प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये संविधान चौकापासून रा. स्व. संघाच्या कार्यालयावर संयुक्त धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाने धडकी भरलेल्या भाजपा सरकारने पोलिसांना पुढे करून मोर्चाला परवानगी नाकारून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचे मनाई आदेश धुडकावत हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाले. अखेर गोवारी टी पॉइंटवर मोर्चेकऱयांना अडविण्यात आले. मोर्चाच्या आधी संविधान चौकात झालेल्या सभेत आंबेडकर आणि सपकाळ यांनी केंद्रातील मोदी सरकार जोरदार हल्ला चढवला.  या वेळी वंचितचे नेते हर्षवर्धन पुंडकर, नागपूर शहर जिल्हा काँग्रेसे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. साजिद खान पठाण, माजी मंत्री अनिस अहमद, सुरेश भोयर, अतुल कोटेचा यांच्यासह काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

देशाला गुलाम बनवणे ही मोदींची राष्ट्रभक्ती आहे का?  – प्रकाश आंबेडकर

देशाचा स्वाभिमान अमेरिकेला विकणे, देशाला गुलाम बनवणे ही मोदींची राष्ट्रभक्ती आहे का? कॅनडासारखा छोटा देश अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नाही तर नरेंद्र मोदी का घाबरतात, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरसंघचालक मोहन भागवत येत्या 15 दिवसांत मोदी यांना जाब विचारतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोदी सैराट झाले आहेत – हर्षवर्धन सपकाळ

मोदींनी संघाच्या कार्यालयाला भेट दिली असता त्यांनी निवृत्ती घ्यावी असे बौद्धिक त्यांना देण्यात आले. पण मोदींने ते मानले नाही, याचा अर्थ मोदी संघाला घाबरत नाहीत, ते सैराट झाले आहेत. संघात नैतिकता राहिलेली नाही हे यातून दिसत आहे. असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.