नामिबियाचा दक्षिण आफ्रिकेला दणका, अखेरच्या चेंडूवर पराभव करत नामिबियाने रचला इतिहास

क्रिकेटच्या मैदानावर शनिवारी एक धक्कादायक निकाल लागला. आयसीसी पूर्ण सदस्य असलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला नामिबियाने अखेरच्या चेंडूवर चार विकेट राखून पराभूत करत इतिहास रचला. हा विजय नामिबियाच्या क्रिकेट इतिहासातील पहिला मोठा विजय ठरला.

आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणाऱ्या नामीबियाने आफ्रिकेच्या बलाढ्य संघाला 8 बाद 134 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात झुंजार खेळ करत नामीबियाने 6 विकेट गमावून 138 धावा करत अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. या अविश्वसनीय यशानंतर संपूर्ण संघाने मैदानाभोवती ‘लॅप ऑफ ऑनर’ घेत प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. या सामन्यापूर्वी नामिबियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही स्वरूपात कधीच आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. परंतु शनिवारी डोनोव्हन फेरेराच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या दर्जाच्या आफ्रिकन संघावर मात करत त्यांनी क्रिकेटविश्वात खळबळ माजवली.

दरम्यान, एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेची मुख्य टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. त्यामुळे टी-20 साठी दुसरा संघ मैदानात उतरला होता. क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रिक्ससारखे तगडे फलंदाज असूनही आफ्रिकेचा डाव 5 बाद 68 अशा संकटात सापडला होता. आपला दुसरा टी-20 सामना खेळणाऱ्या जेसन स्मिथने 31 चेंडूंत 30 धावा करून संघाचा थोडा सन्मान वाचवला.

नामिबियासाठी 27 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज रुबेन ट्रम्पलमनने जबरदस्त गोलंदाजी करत 28 धावांत 3 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाचा वरचा क्रम कोलमडला आणि संघाने 66 धावांपर्यंत 4 विकेट गमावले. मात्र अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज जेन एडवर्ड ग्रीनने 23 चेंडूंत नाबाद 30 धावांची झुंजार खेळी करत डाव सावरला. शेवटी पुन्हा रुबेन ट्रम्पलमननेच आपली सर्वांगीण कामगिरी दाखवत फक्त 8 चेंडूंत 11 धावा ठोकल्या आणि शेवटच्या चेंडूवर सहावा विकेट गमावून नामिबियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.