मोदी आणि शहा खोट्या नॅरेटिव्हचे ‘मास्टरमाईंड’! नाना पटोले यांचा हल्लाबोल

खोट्या नॅरेटिव्हचे मास्टरमाईँड अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. लोकसभेला ‘400 पार’चा नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांनी महाराष्ट्रात विधानसभेला ‘250 पार’चा नॅरेटिव्ह सेट करून दाखवावा, असे आव्हान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

लोकशाही न मानणारी व्यवस्था भाजपमध्ये आहे. खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याची मानसिकताही भाजपचीच आहे. मोदी सरकारने संविधानाला धरून कधीच कारभार केला नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण महाराष्ट्र आहे. सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात आले. सुप्रिम कोर्टानेही यावर ताशेरे ओढलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू आहे. पुढेपुढे काय होईल हे कळेलच, पण सध्या जनमत आमच्या बाजूने आहे. आम्ही मीपणा करणार नाही. महाविकास आघाडी सर्वांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप ऑगस्टमध्ये होईल आणि सप्टेंबरमध्ये उमेदवारही जाहीर होतील, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून भाजपचा निवडणूक प्रचार सुरू असतो. वाघनखांबाबतही खोटा प्रचार सुरू आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अद्याप उभे राहिलेले नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी फक्त महाराष्ट्रात किती प्रॉपर्टी अजून विकायची शिल्लक आहे हे पाहण्यासाठी येतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकण्याचे काम भाजपकडून सुरू असून या पिल्लावळींना सत्तेतून बाहेर काढणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

महाराष्ट्रातील जमीन अदानींच्या घशात घातली जात आहे. सर्वकाही अदानींना देण्याचा डाव आहे. राज्य सरकारवर सर्व कंट्रोल गुजरातचा आहे. त्यामुळे त्यांना वारंवार दिल्लीला धाव घ्यावी लागते, अशी टीका नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वारंवार दिल्लीवारीवर केली.