
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची सभागृहात जाहीर माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही, असे म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात संताप व्यक्त केला. यानंतर नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले आणि राज दंडाला हात लावला. यामुळे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केले.
या सरकारची वास्तविकता आज समोर आलेली आहे. यांचे आमदार, यांचे कृषिमंत्री हे शेतकऱ्याला भिकारी समजतात. आणि हे आम्ही सहन करणार नाही. सरकार विरोधात आम्ही रोज आवाज उठवू. एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही. उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू. आमदार लोणीकर आणि कृषिमंत्र्यांवर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाचे पैसे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पैसे असतील ते घेतल्याशिवाय सभागृहात आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.