
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सोमवारी (29 डिसेंबर 2025) रात्रीपासून घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर महायुतीमध्ये मिंधे गटाने आज बहुतांश जागांवर आपली स्वतंत्र उमेदवार उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्यांची युती होणार होती, मात्र जागा वाटपावरुन ही बोलणी फिस्कटली. तसेच भारतीय जनता पक्षाने एक आकडी जागा देण्याची अट घातल्याने आता मिंधे गट स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महायुतीतील जागा वाटपाबाबत भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत स्वतंत्र बैठका झाल्यानंतर सुद्धा मिंधे गटाच्या नेत्यांनी अखेर नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तरमधून स्वतंत्र उमेदवारी भरण्यास सुरुवात केली. सुरुवातीला संपर्कप्रमुख हेमंत पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दोन टप्प्यात चर्चा केली, मात्र दोन्ही मतदारसंघात सहा-सहा जागा देण्याची अट भाजपाने टाकली. मात्र स्थानिक आमदार दोन्ही मिंधे गटाचे असल्याने ५० टक्के जागा देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. मात्र ती भाजपाने फेटाळली. गेल्या आठवड्यात झालेल्या मिंधे गटाच्या पदाधिकार्यांसोबत माजीमंत्री डी.पी.सावंत, महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्यासोबत झालेली बोलणीही फिस्कटली.
दुसरीकडे राष्ट्रवादी व मिंधे गटाने चर्चा सुरू केली. मात्र ती चर्चाही निष्फळ ठरल्याने आता महायुतीत तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघात जवळपास ६० उमेदवार मिंधे गटाने उभे केले. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच आडकाठी भूमिका घेतल्याने ही युती तुटल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणखी तीन दिवस असल्याने चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. चिखलीकरांनी मात्र याबाबत काहीही अधिकृत बोलण्यास नकार दिला. पोकर्णा मात्र अजूनही सकारात्मक चर्चा होईल असे सांगत असले तरी मिंधे गटाच्या अधिकृत व्यक्तींनी, आता आम्ही स्वतंत्र लढणार आणि जिंकणार असे स्पष्ट केले आहे. एकंदरच नांदेडमध्ये भाजपा, राष्ट्रवादी आणि मिंधे गट हे महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार हे आता स्पष्ट झाले आहे.

























































