Nanded News – भाजप आमदाराची सहकार विभागाच्या उपनिबंधकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

सत्तेचा माज चढलेल्या भाजप आणि महायुतीच्या आमदारांची वादग्रस्त प्रवृत्ती दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेश पवार यांनी सहकार विभागाचे नांदेड जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांना अर्वांच्य शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये नरसी सेवा सोसायटीच्या प्रशासक नियुक्तीविषयी संभाषण आहे. या क्लिपमध्ये भाजपच्याच कार्यकर्त्याला हटवून शासनाचा प्रतिनिधी नेमण्यासाठी भाजपाचाच आमदार वरिष्ठ अधिकार्‍याला कपडे काढून चौकात कुत्र्यासारखे मारेन या शब्दात धमकावत आहे. क्लिप व्हायरल होताच संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.

नायगाव तालुक्यातील बहुचर्चित नरसी सेवा सहकारी सोसायटीतील एका संचालकाच्या निधनाने गावकरी विकास पॅनल व आपलं पॅनल यांच्या समसमान सहा जागा होत्या. त्यात चेअरमन निवडीसाठी दोनदा घेतलेल्या बैठकीत गावकरी पॅनलचे सदस्य गैरहजर राहिल्याने निवड तहकूब झाली. अखेर तालुका उपनिबंधक कौरवार यांनी सहकार राज्यमंत्री भोयर यांच्या सूचनेनुसार भाजपची तीन सदसिय प्रशासकीय प्राधिकृत समिती नेमली.

दरम्यान स्थानिक राजकारणातील पक्षीय मतभेदातून भाजपा आमदार राजेश पवार यांनी संकुचित मनोवृत्ती दाखवत भाजपच्याच कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना पत्र देवून नरसी सोसायटीवरील भाजपचे प्रशासकीय मंडळ हटवून शासनाची समिती नियुक्त करण्याची मागणी पवार यांनी केल्याची माहिती मिळते. याच मागणीच्या अनुषंगाने आमदार राजेश पवार यांनी नांदेड येथील जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांच्याशी दुसर्‍या एका आमदाराच्या मोबाईलवरून साधलेला संवाद आता व्हायरल झाला आहे.

यात राजेश पवार हे भिलारे यांना अर्वांच्च भाषेत शिवीगाळ करत असून नरसी सोसायटीच्या विषयात तुझी एवढी डेरिंग झालीच कशी? हरामखोरपणा केलास, शासनाची फसवणूक केलीस, कोणत्या गावचा आहेस, रिटायर झाल्यावर सुद्धा तुला सोडणार नाही अशा एकेरी भाषेत बोलत असल्याची ही क्लिप आहे. उपनिबंधक भिलारे यांना अक्षरशः आईवरून शिवीगाळ केल्याचेही क्लिपमध्ये आहे. तसेच माझ्या पत्रावर तात्काळ निर्णय न घेतल्यास चौकात कपडे काढून कुत्र्यासारखे मारेन ही लास्ट वॉर्निंग या शब्दात भिलारे यांना धमकवण्यात आल्याची ही वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप सोमवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबल उडाली.

याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ही ऑडिओ क्लिप खरी असून एमपीएससीच्या माध्यमातून आलेला मी वर्ग एकचा वरिष्ठ अधिकारी असताना खालच्या स्तराची भाषा वापरून सत्ताधारी लोकप्रतिनिधी आमदार राजेश पवार यांनी माझ्याशी अर्वांच्च बोलणे योग्य नाही, अशी खंत यावेळी भिलारे यांनी व्यक्त केली. भाजपा आमदार राजेश पवार यांनी फोनवरून मला दिलेली वागणूक अत्यंत चुकीची असून माझ्या निवृत्तीला अवघे 15 दिवस राहिले असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधीने माझ्याशी केलेली वर्तणूक हिटलरशाहीचा नमुना आहे की काय? अशी संतप्त प्रतिक्रिया देखील जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांनी सामनाशी बोलताना दिली.

याबद्दल भाजपा आमदार राजेश पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज असल्याचे दिसून आले. एकूणच आधी निकालाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात गाजलेल्या नरसी सेवा सोसायटीच्या प्रशासक वादावरून आत्ता भाजप आमदाराने वरिष्ठ अधिकार्‍याला केलेली शिवीगाळ यामुळे सबंध नांदेड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाल्याचे चित्र आहे.