Nanded News – तेरे जैसा यार कहां… तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून म्हटलं गाण, विभागीय आयुक्तांनी केली कडक कारवाई

तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून तहसीलदार प्रशांत विश्वासराव थोरात यांनी उमरी येथील आपल्या दालनात निरोप समारंभाच्यावेळी “तेरे जैसा यार कहां” हे गाणं म्हंटलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्याने विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केलं आहे.

उमरी येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांची शासन आदेशानुसार 29 जुलै रोजी बदली झाली होती. त्यांना निरोप देण्यासाठी शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी व अन्य कार्यकर्त्यांनी उमरीच्या तहसील दालनात कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या खुर्चीत बसून त्यांनी “तेरे जैसा यार कहां, कहां एैसा याराना, याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना” हे गाणं म्हटलं होतं. याबाबतचा व्हिडीओ ज्या दिवशी कार्यक्रम झाला त्या दिवशी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी त्यांच्याकडून व त्यांच्या सहकार्‍यांकडून व्हायरल करण्यात आला. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत तक्रारी झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी प्रशांत थोरात यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) 1979 चे नियम 3 (1) चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्ताकडे केली होती. तसा अहवाल शासनाकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविण्यात आला आहे.

शासकीय कर्मचार्‍याला अशोभनिय ठरेल असे वर्तन त्यांनी केल्याने शासनाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असून ही बाब गंभीर आहे. सदरच्या व्हिडीओमध्ये विविध प्रकारचे गाणे गातांना अंग विक्षेप व हातवारे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाच्या नियमानुसार आता प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे. उमरी येथील निरोप घेतल्यानंतर ते लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे तहसीलदार म्हणून रुजू झाले होते. निलंबित कालावधीमध्ये प्रशांत थोरात यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव हे राहील. प्रशांत थोरात यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या पूर्व संमतीशिवाय आपले मुख्यालय सोडू नये, तसेच निलंबन कालावधीत प्रशांत थोरात यांनी खाजगी नोकरी स्विकारू नये किंवा इतर व्यवसाय करु नयेत, अन्यथा त्यांच्यावर अन्य कारवाई करण्यात येईल, असे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी एका अध्यादेशाद्वारे जारी केले आहेत.