माजी नगरसेवकाचा राडा; आमदार कार्यालयाबाहेर शिवीगाळ, पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

मिंधे गटाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख कल्याणकर (रा. तरोडा) यांनी काल रात्री आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर शटरवर डोके आपटत शिवीगाळ केली. गस्तीवर असलेल्या भाग्यनगर पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी पोलिसांनाही शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न केला आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

रात्री एक वाजण्याच्या सुमारास भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणाऱ्या पोलिसांना आमदार कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर बाळासाहेब देशमुख हे शटरवर डोके आपटत, आरडाओरड करत आणि पायऱ्यांवर पडून जखमी झालेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी उलट पोलिसांना शिवीगाळ केली. “माझ्याकडे पिस्तूल आहे, गोळ्या घालून खतम कारेन,” अशी धमकी देत सहायक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांच्या शर्टचे बटन तोडले आणि झटापट केली.

पोलिसांनी बाळासाहेब देशमुख यांना ताब्यात घेऊन भाग्यनगर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांना धमकावणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

बाळासाहेब देशमुख हे यापूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासमवेत मिंधे गटात प्रवेश केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांना धमकावण्याचा हा प्रकार सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.