नंदूरबारमध्ये देवगोई घाट परिसरात विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

नंदूररबारमध्ये अक्कलकुवा मोलगी जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस थेट शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात खोल दरीत कोसळलेल्या बसमध्ये दबल्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले असून जखमींना तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोलगी गावातील विद्यार्थी नेहमीप्रमाणे बसने अक्कलकुवाकडे निघाले होते. बस देवगोई घाटातील आमलिबारी परिसरात पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही क्षणांतच बस शंभर ते दिडशे फुट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये अंदाजे 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती मिळालेली आहे. बस चक्काचूर झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ग्रामीण पोलीस व अग्निशामक दलालाही तातडीने माहिती देण्यात आली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.