नाशिकमधील म्हाडाची घरे हडपण्याच्या घोटाळ्याची वेळ पडल्यास ईडी चौकशी, महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पामध्ये गरीबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर  आहे. यामध्ये कितीही मोठी आसामी असली तरी सोडणार नाही. प्रसंगी या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवू, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.

नाशिक दौऱयात चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गरिबांसाठी असलेली वीस टक्के घरे बळकावली गेली आहेत. एकाच दिवसात जमिनीचे तुकडे पाडणे, नोंदी घेणे आणि नकाशे मंजूर करणे हे मोठे वर्तुळ आहे. या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून यात एक आयपीएस आणि दोन आयएएस अधिकारी आहेत. चौकशी अहवाल पंधरा दिवसांत येईल. लाचलुचपत विभाग आणि भूमी अभिलेख विभागातून या घोटाळ्याची सुरुवात झाली असून, नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱयांना याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ शिक्षा नाही, तर बिल्डरांकडून वीस टक्के मालमत्ता ताब्यात घेऊन ती गरीबांना मिळवून देणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.