
प्रभाग 27 (अ)मध्ये निकाल बदलण्यात आल्याने अजित पवार गटाच्या आशा खरात पराभूत, तर भाजपाच्या प्रियंका दोंदे विजयी झाल्या, असा आरोप करीत हजारो नागरिकांनी मंगळवारी खरात यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, फेरमतमोजणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. निकालातील घोळामुळे भाजपाविरोधात सत्तेतील मित्रपक्षच उभा ठाकल्याने वातावरण तापले आहे.
प्रभाग 27 (अ) फेरमतमोजणी घ्यावी, या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाली, याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता यांची चौकशी करून कारवाई करावी या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी भाजपा उमेदवाराकडून आर्थिक लाभ घेवून पक्षपातीपणा केल्याचेही यात म्हटले आहे. लोकशाही झिंदाबाद, हुकूमशाही मुर्दाबाद, फेरमतमोजणी झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणला होता. तीन दिवसात मागण्यांची गांभीर्याने दखल घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रशांत खरात यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, आयुक्त यांना दिला आहे.
प्रभाग 27चा निकाल बदलल्याचा अजित पवार गटाचा आरोप
महापालिका निवडणुकीत प्रभाग 27 (अ) मध्ये भाजपाच्या प्रियांका राकेश दोंदे या 7 हजार 665 मते मिळवून विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. अजित पवार गटाच्या आशा प्रशांत खरात यांना 7 हजार 105 मते मिळाली. मात्र, ही मतमोजणीची प्रक्रिया संशयास्पद वाटल्याने 16 जानेवारी रोजी केंद्रावरच उमेदवार प्रतिनिधी प्रकाश खरात यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र, कुठलेही ठोस कारण न देता ती नाकारण्यात आली, खरात यांना बाहेर काढण्यात आले होते. यामुळे निकाल बदलल्याचा आरोप करीत या प्रभागातील हजारो नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन ठिय्या मांडला.

























































