
नुकत्याच पार पडलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसतानाच इस्लाम पार्टीने सर्वाधिक 35 जागा मिळवत आपले वर्चस्व राखले. त्यांनी समाजवादी पक्षाला सोबत घेत ‘सेक्युलर फ्रंट’ नावाची आघाडी घेत निवडणूक लढवली. मात्र बहुमतासाठी आघाडीला तीन जागांची आवश्यकता असताना अन्य पक्ष या आघाडीला पाठिंबा देणार का, याविषयी तर्कवितर्क लढविले जात असतानच आता काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पाठिंब्यावरच इस्लाम पार्टीचा महापौर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालेगाव महापालिकेच्या 84 जागांपैकी इस्लाम पक्षाने सर्वाधिक 35 जागा पटकावल्या तर त्यांचा कट्टर विरोधक असलेल्या एमआयएम पक्षाला 21 जागा मिळाल्या. शिंदे गटाला 18 जागा मिळाल्याने तो तिसऱ्या स्थानी आला, तर समाजवादी पक्षाने पाच, व काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळविला आहे. इस्लाम पार्टीची समाजवादी पार्टीबरोबर आघाडी असल्याने त्यांचे संख्याबळ 40 च्या घरात गेले आहे. मात्र बहुमतासाठी त्यांना आणखीन तीन जागांची आवश्यकता असल्याने त्यांनी विनाअट पाठिंबा देण्याचे आवाहन एमआयएम, शिंदे गट आणि काँग्रेस पक्षाला केले आहे. जनादेश आम्हाला असल्याने विकासाच्या मुद्द्याला आम्हाला पाठिंबा द्यावा असे इस्लाम पार्टीचे संस्थापक, माजी आमदार आसिफ शेख यांनी केले आहे. पडद्याआड महापालिकेच्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडतात याविषयी तर्कवितर्क सुरू असतानाच काँग्रेसने मात्र सेक्युलर फ्रंटला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.

























































