
पेसा क्षेत्रातील नोकरभरती त्वरित करावी, वनपट्टाधारकांना केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी शनिवारी किसान सभेच्या वतीने दिंडोरी चौफुलीवर तीन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलनकर्ते रस्त्यावरून बाजूला झाले. मात्र, त्यांनी रविवारी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे.
पश्चिमवाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर सिमेंटचे बंधारे बांधून शेती-उद्योगधंद्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, वनाधिकार कायदा, 2006 अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली दहा एकर हक्काची जमीन तत्काळ लाभधारकांना द्यावी, स्वतंत्र सातबारा तयार करून पती-पत्नीचे नाव कब्जेदार म्हणून नोंदवावे, वनपट्टाधारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर यांसारख्या केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, सर्व पिकांना हमीभाव द्यावा, भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग जसा 40 हजारांचा बोनस देतो त्याप्रमाणे वनपट्टाधारकांनाही लाभ मिळावा, पेसा क्षेत्रातील सर्व खात्यांमधील नोकरभरती, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती त्वरित पूर्ण करावी, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमधील कर्मचारी भरती करावी, शेतकऱ्यांना चोवीस तास वीजपुरवठा करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास किसान सभेच्या वतीने दिंडोरी चौफुलीवर ‘रास्ता रोको’ करण्यात आला. त्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चेकऱ्यांनी रॅली काढली.
सुमारे तीन तास हे आंदोलन सुरू असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली; परंतु आंदोलनावर ठाम राहत त्यांनी वाहतुकीसाठी एक बाजू मोकळी करून दिली आणि ते तहसील कार्यालयासमोर जमा झाले. मागण्या मान्य होईपर्यंत धरणे सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
रविवारी सकाळी नायब तहसीलदार वैशाली दराडे यांनी प्रशासनाच्या वतीने चर्चा केली. मात्र, ठोस तोडगा न निघाल्याने आजही साडेआठशेहून अधिक जणांनी तेथे ठिय्या दिला आहे. त्यात किसान सभेचे जिल्हा सचिव रमेश चौधरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव देवीदास वाघ, आप्पा वटाणे यांच्यासह किसान सभा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी आहेत.
























































