पैसे वाटा-सत्ता मिळवा हेच सध्या चाललंय – राज ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2017 मध्ये म्हणाले होते की, नाशिकला दत्तक घेईन. मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, क्रीडा प्रबोधिनी, रोजगाराच्या योजना राबवू. फडणवीसांच्या घोषणेला नाशिककर भुलले. आम्ही विकासकामे करूनही आमचा पराभव झाला. ज्या लोकांनी काहीही केले नाही ते सत्तेत आले. मात्र नाशिककरांना वचन देणारा बाप आतापर्यंत इकडे फिरकलाच नाही, असा जबरदस्त घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. पैसे वाटायचे आणि सत्ता मिळवायची हेच काम सध्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात चार वर्षांपूर्वी पालिकांची मुदत संपूनही आतापर्यंत निवडणुका का घेतल्या नाहीत याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले. आताच्या निवडणुकीत इतका गोंधळ सुरू आहे की, छाननी वेळी एकाने तर एबी फॉर्मच गिळला. त्यामुळे निवडणुका कोणत्या थराला गेल्या आहेत याचा विचार करण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले. राज्यात 60-70 नगरसेवक बिनविरोध निवडून येतात? म्हणजे तुम्ही तिकडच्या लोकांना मतदानाचा हक्क देणार नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुलाने म्हटले नाही पाहिजे की, दीड हजारासाठी आई-बाप विकले गेले!

यांना कामे करायची नाहीत, यांना सत्ता मिळवण्यासाठी जातीधर्माच्या नावावर लोकांना भुलवायचे काम सुरू आहे. मात्र तुम्ही तुमच्या भवितव्यासाठी शिवसेना-मनसे युतीला सत्ता द्या. कुठेही विकले जाऊ नका. मुलाने म्हटले नाही पाहिजे की, दीड हजारासाठी आई-बाप विकले गेले. जातीधर्माच्या प्रचाराला बळी पडू नका.

… हा कार्यकर्त्यांचा अपमान नाही का?

1952 मध्ये जनसंघ नावाने जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्ये दुसऱयाची पोरं भाडय़ानं का घ्यावी लागतात, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला. तुम्ही माणसं उभी केली होती ना? मग दुसऱयाची पोरं कडेवर का घेता? तुमच्या पक्षात जी लोकं इतकी वर्षे काम करताना त्यांना डावलून पक्षात बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देता? हा त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा अपमान नाही का, असा टोलाही राज ठाकरे यांनी हाणला.

महाराष्ट्रात निवडणुकीच्या नावाखाली इतका गोंधळ सुरू आहे की, कोण कुठे चाललेय याचा पत्ताच लागत नाही. पॅरम इतका फुटलाय की, कोणाची सोंगटी कोणाच्या भोकात आहे हेच समजत नाही.

आधी झाडं तोडायची, मग ती जागा उद्योगपतींच्या घशात घालायची!

2012 मध्ये आमची सत्ता असताना कुंभमेळा झाला. त्याचं नियोजन उत्तम करण्यात आलं. त्यासाठी तपोवनातील एकही झाड कापलं नाही. त्यावेळच्या नगरसेवकांचा, प्रशासकांचा अमेरिकेतही सत्कार झाला. मग आता काय झालं? कारण भाजपचं आधीच ठरलंय की आधी झाडं तोडायची मग ती जागा उद्योगपतीच्या घशात घालायची असे हे कारस्थान आहे, असेही ते म्हणाले. तपोवनातील झाडे महाजनना कापायची आहेत. आधी इथली झाडे छाटायची आणि नंतर बाहेरून आणून लावायची. त्याचप्रमाणे पक्षातील कार्यकर्ते छाटले आणि नंतर बाहेरून झाडे आणून लावली जात आहेत.