
भाजपाने हिंदुत्वाचा बुरखा घातला असून त्यांना फक्त शहरांचा सत्यानाश करायचा आहे. धर्माची एक पट्टी अशी लावली की सगळे अंधभक्त झालेत आणि मोहिनी टाकून सर्वांना स्वप्नात गुंगवून ठेवले जातेय. त्यांचे हिंदुत्व चुनावी आहे, त्यांच्या झुंडशाहीविरोधात आजच उभे राहा, नाहीतर असा वरवंटा फिरेल की, इंग्रजांपेक्षा जास्त काळ यांच्या गुलामगिरीत राहावं लागेल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला जागे केले. माझी गेल्या दोन वर्षांतील नाशिकमधील ही चौथी सभा आहे. आज माझ्यासोबत माझा भाऊ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहे, याचा मला खूप आनंद होत आहे, असे ते सुरुवातीलाच म्हणाले.
आम्ही दोन्ही भाऊ मिळून तुम्हाला वचन देत आहोत की, जे आम्ही बोलतो ते करून दाखवणारच. आजपर्यंत आम्ही जे जे बोललो ते करून दाखवले आहे. त्यामुळे आम्ही वचननाम्यातून दिलेल्या प्रत्येक शब्दाला आमचे वचन मानून तुम्ही जर का आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊ शकतो. कारण हा ठाकरेंचा शब्द आहे. ही बोगस मोदी गॅरंटी नाही. त्यामुळे आम्हाला आशीर्वाद देणार का, असे आवाहन करताच अथांग जनसागराने हात उंचावत एकजुटीची वज्रमूठच आवळली. हे मजबूत हात जोपर्यंत आमच्यासोबत आहेत तोपर्यंत शिवरायांच्या पवित्र भगव्याला कुणी धक्का लावू शकणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
तुम्हाला चांगले आयुष्य देण्यासाठी सत्ता हवीय
आम्हाला तुम्हाला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. होय, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय. मग भाजप आणि ते सगळे जे एकत्र आलेत ते काय विटू दांडू खेळायला एकत्र आलेत का, असा सवालही यावेळी केला. होय आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी, तुमच्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी राबवायची आहे, असेही ते यावेळी म्हणाले. आम्ही त्यांच्या कोणत्याही कामाचे श्रेय घेतले नाही. मात्र त्यांच्याकडून हा प्रकार सुरू आहे. आम्हाला याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
निवडणूक आयोगच शेपूट घालून बसला आहे
विधानसभा अध्यक्षांचा अधिकार विधानसभेत असतो. त्याने निःपक्षपातीपणे वागले पाहिजे. मात्र समोरच्या उमेदवाराने अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणणारा नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जात आहे. आम्ही जरा कुठे काही केलं तर निवडणूक आयोग लगेच होताडा घेऊन बसलेला असतो आणि यांनी काही केलं तरी आयोग काहीही करीत नाही. कारण निवडणूक आयुक्तच शेपूट घालून बसलेला आहे. ही लोकशाही नाही ही झुंडशाही आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱया नार्वेकरच्या एकाच कुटुंबात तीन, चार तिकीटं दिली गेली आहेत आणि तो आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करतो, असेही ते म्हणाले.
मुलाबाळांचे भवितव्य ठरवणारी निवडणूक
सरकारकडून पंत्राटदारांना काम सुरू होण्याआधीच आगावू पैसे दिले जातात. हा आगावूपणा लक्षात घ्या. मुंबईत त्यांनी तेच केलं. तीन लाख कोटी आगावू दिले. कामासाठी आगावू रक्कम देऊन त्या रकमेतून हे आगावू पैसे काढतात आणि ते लोकांना वाटतात. म्हणून निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. हार-जीत आमचे भवितव्य ठरवणार नाही. आमचं सोडून द्या. तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचं आहे, तुमच्या मुलाबाळांच्या लेखी काय होणार आहे. त्यासाठी करायला हवं हे ठरवणारी ही निवडणूक आहे.
भाजपला राजकारणात पोरं होत नाहीत त्याला आम्ही काय करणार
भाजपला राजकारणात पोरं होत नाहीत त्याला आम्ही काय करणार असा जोरदार टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. आमच्यासमोर अस्सल निष्ठांवत आहेत. भाजपला मला प्रामाणिकपणे विचारायचे आहे की तुमच्या नशिबी नक्की काय आलंय. तुमच्या कार्यकर्त्यांवर सतरंज्या उचलण्याची वेळ आलीय. सत्तेसाठी तुम्हाला कुत्ता, बिल्लीसारखी माणसं लागत आहेत. भाजप हा उपऱयांचा, उपटसुंभांचा पक्ष झाला आहे.
रावणालासुद्धा भाजपात घेतील!
मुनगंटीवारच म्हणाले होते की शनिशिंगणापूर आणि भाजपला दरवाजे नाहीत. शनीशिंगणापुरला संकटग्रस्त जातात, तर ईडी, इन्कमटॅक्सग्रस्त सर्वजण भाजपमध्ये जात आहेत. चोर भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, असाच हा प्रकार सुरू आहे. ज्या रावणाचा श्री रामाने वध केला, त्या रावणाला सुद्धा पक्षात घेतली इतके हे निर्लज्ज झाल्याचा घणाघात त्यांनी केला. नाशिकमध्ये भाजपच्या देवयानी ताईंनीच भाजप उपऱयांचा पक्ष असल्याचे सांगितले. नवी मुंबईत गणेश नाईकांनीच शिंदेच्या काळातील भ्रष्टाचार बाहेर काढला. पक्षाने सांगितले तर शिंदेंचा टांगाच पलटी करेन, अशी भाषा केली. गणेश नाईकांना मला सांगायाचे आहे की, त्या टांग्यात तुम्ही पायच कशाला घालायचा. करा ना तो पलटी. अशी ही यांची अभद्र युती आहे, टोलाही त्यांनी हाणला.
त्यांनी आता आपले काय ‘सुटले’ ते सांगावे!
भाजपाने पाठीत वार केला म्हणून आम्ही काँग्रेसबरोबर गेलो, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असे ते म्हणत होते. भाजपने आता मिंध्यांचं पायपुसणं करून फेकलं आणि अंबरनाथला भाजपने काँग्रेससोबत युती केली. तर अकोटमध्ये शिंदे थेट एमआयएमसोबत गेले. त्यामुळे आमच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी त्यांचे आता नक्की काय ‘सुटले’ ते सांगावे असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले. कुठे आहे यांचे हिदुत्व, असा सवालही त्यांनी यावेळी केला. भाजप सध्या भ्रष्टाचारी, चोर येतात त्यांना सोबत घेऊन चालला आहे.
नाशिक येथील सभेप्रसंगी शिवसेना नेते, सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, अनिल कदम, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन आहेर, प्रवीण नाईक, लालचंद सोनवणे, निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, मनसे नेते अनिल शिदोरे, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, डॉ. प्रदीप पवार आदींसह दोन्ही पक्षांचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, शिवसैनिक, मनसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटला
पंतप्रधान मोदींनी अयोद्धेतील राममंदिरावर फडकावलेल्या धर्मध्वजावर झाडाचे चिन्ह आहे. असे असताना ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तपश्चर्येला बसले होते, जिथे पर्णकुटी होती त्या जागेवरील झाडे तुम्ही कापणार? ह्यांना तपोवनाचे महत्त्व नाही. त्यामुळे भाजपचे हिंदुत्त्व ‘चुनावी’ असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. कुंभमेळ्यानंतर या ठिकाणी शासकीय नमो भवन उभारणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा नसता तर त्यांनी इथली झाडे कापली असती का? तिकडे आरेचे जंगल कापताहेत, आरवली पर्वत बोडका करताहेत, ताडोबा-अंधारीत खाणीसाठी जागा देण्याचे राजकारण सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले. जे तिकडे झाले ते आमच्याकडे होणार नाही, असा विचार कराल तर एक दिवस तुमच्यावरही ही वेळ येईल, असे ते म्हणाले.
यापुढे गद्दारांना आणि या भ्रष्टाचाऱ्यांना जे बेडूक उडय़ा मारून गेलेत तिकडे डराव डराव करत बसू द्या, पण आपलं नाशिक हे आपल्या हातामध्ये ठेवा. शिवसेना आणि मनसेची भक्कम मजबूत सत्ता या नाशिकमध्ये आणा. म्हणजे उद्या कोणी दत्तक बाप इकडे पाय ठेवायला घाबरला पाहिजे. तेवढी ताकद नक्कीच तुमच्यामध्ये आहे!
खासी नही खासियत है!
दोन-चार दिवस माझा घसा बसला होता. हिंदीत एक मुलाखत झाली. त्यात मला प्रश्न विचारला, इस बार आपको मुंबई की चुनाव के बारे मे क्या खासियत लगती है…मी म्हटलं, इसबार खासी यहीं खासियत है…कारण सगळे मुंबईकर सध्या खोकताहेत. फुप्फुसाचे आजार होताहेत. कारण नियोजनशून्य विकास. सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेत. धूळ सिमेंट सगळं हवेत पसरतेय. मुंबईकरांच्या श्वासामध्ये हे सगळं प्रदूषण जातंय. उद्या नाशिकमध्येही ते तेच करतील, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.






























































