समाजाच्या प्रगतीसाठी संघर्ष करू या!, राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मेळाव्यात मान्यवरांचा निर्धार

चर्मकार समाजाच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी आपण प्रचंड संघर्ष करू या. त्यासाठी आपणाला संघटित व्हावे लागेल. आपला समाज जर रसातळाला जाऊ नये असे वाटत असेल तर आपल्याला समाजासाठी नियमितपणे काही वेळ द्यावाच लागेल, असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव माने यांनी केले.

राष्ट्रीय चर्मकार संघ संस्थापक अध्यक्ष बाबुराव माने यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली धारावी येथील मनोहर जोशी महाविद्यालयात राज्यातील चर्मकार समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि चिंतन बैठक झाली. दरम्यान, ज्या ज्या ठिकाणी समाजबांधवांवर अन्याय होईल त्या ठिकाणी सर्वांनी न्यायासाठी तत्काळ पोहोचून आंदोलन उभे केल्याशिवाय आपली कोणी दखल घेणार नाही. त्यासाठी आपण सजग आणि सावध राहिले पाहिजे, असे मत मान्यवरांनी मांडले. यावेळी समाज नेते अ‍ॅड. विठ्ठल कवादे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रामभाऊ कदम, समाज नेते अ‍ॅड. नारायण गायकवाड, डॉ. पोळ, मनाली गवळी, परशुराम इंगोले, विलास गोरेगांवकर, संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. कैलाश आगवणे उपस्थित होते.