
पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. गिरीश पार्क परिसरात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. या घटनेत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले. पश्चिम बंगालच्या उद्योग मंत्री शशी पांजा यांनी या हाणामारीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी या ठिकाणी राजकीय दौरे सुरू केले आहेत. शनिवारी पंतप्रधान मोदी कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर 18 हजार 680 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदींच्या या रॅलीआधी भाजप समर्थक आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाली. बसमधून मोदींच्या रॅलीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मंत्री शशी पांजा यांनी केला आहे. भाजपने हे आरोप फेटाळून लावले असून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे.
मोदी म्हणाले… निर्दयी सरकारचा अंत जवळ आलाय
कोलकाता येथील रॅलीत संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जंगलराजची उलटी गिनती सुरू झाली आहे. या निर्दयी सरकारचा अंत जवळ आला आहे. येथील निर्दयी सरकार गोंधळले आहे. आजही, त्यांनी प्रचंड गर्दी रोखण्यासाठी सर्व शस्त्रे उगारली. त्यांनी पूल बंद केले, वाहतूककोंडी केली, आमचे झेंडे काढले आणि पोस्टर फाडले, परंतु ते या गर्दीला थांबवू शकले नाहीत, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर टीका केली.
भाजप खुनी आहे – शशी पंजा
भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री डॉ. शशी पांजा यांच्या गिरीश पार्क परिसरातील कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये अनेक टीएमसी कार्यकर्ते जखमी झाले. भाजप गुंड नाही, तो खुनी पक्ष आहे, असा संताप या घटनेनंतर पांजा यांनी व्यक्त केला.


























































