
सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी माणसं काय करतील याचा नेम नाही. बंगळूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी ‘ह्यूमन पार्सल’ स्टंट केला. यासाठी वडिलांना पोत्यात भरून पॅकिंग करून पार्सल करण्यासाठी कुरिअरच्या ऑफिसमध्ये नेले. मात्र कुरिअर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत एक महिला, तिचा पती, सासू आणि दीर यांचा समावेश होता, तर महिलेच्या वडिलांना पार्सलमध्ये कोंडण्यात आले होते.
रमजान आणि उगादीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी आणि बस तिकिटांची कमतरता यावर प्रकाश टाकण्यासाठी हे कुटुंब रील बनवत होते. तिकिटे उपलब्ध नसतील तेव्हा माणसांना कुरिअर करावे लागेल हे रीलमधून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यासाठी त्यांनी महिलेच्या वडिलांना बॉक्समध्ये भरून पार्सल तयार केले. यानंतर हे पार्सल घेऊन कुरिअर करण्यासाठी गेले.
कुरिअर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पार्सलमध्ये काय आहे विचारणा केली असता पार्सल उघडण्यात आले. पार्सल उघडताच कर्मचारी हैराण झाले. आत अडकल्याने वडिलांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांची प्रकृती गंभीर होत चालली होती. कुरिअर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना बाहेर काढले. यानंतरही कुटुंब कुरिअर कर्मचाऱ्यांशी वाद घालत होते आणि पार्सल स्वीकारण्याचा आग्रह करत होते.
अखेर कुरिअर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कुरिअर कार्यालय गाठून कुटुंबाला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात कुटुंबाने माफी मागताना आणि आपली चूक कबूल करतानाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. पोलिसांनी कुटुंबाला कडक ताकीद देऊन सोडून दिले.





























































